एपीएमसीच्या मिटिंग हॉलमध्ये मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीत संचालकांवर व्यापाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. याप्रसंगी बैठकीत जय किसान खासगी होलसेल भाजी मार्केट ला परवानगी देणे चुकीचे असून ज्यांनी ही परवानगी दिली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
करोडो रुपये खर्च करून मार्केट यार्ड मध्ये एपीएमसी भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी गाळेधारकांनी लाखो रुपये खर्च करून गाळे घेतले आहेत. मात्र जय किसान खासगी भाजी मार्केट मुळे एपीएमसी मधील व्यापार डबघाईला आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
जय किसान खाजगी भाजी मार्केट मुळे एपीएमसी ला दरमहा अडीच लाख रुपये नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे अनेक व्यापारी अडचणीत सापडले आहेत. तसेच एपीएमसीमध्ये जय किसान ला परवानगी द्यावी म्हणून कोणताही ठराव मंजूर न झाल्याचे स्पष्टीकरण या वेळी एपीएमसी चे अध्यक्ष युवराज कदम यांनी दिले. त्याच बरोबर जिल्हाधिकारी किंवा आर सी यांनी अहवाल दिल्यास जय किसान चा परवाना रद्द होऊ शकतो असे म्हणणे देखील या बैठकीत मांडण्यात आले.