बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाच्या वतीने सामुदायिक सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी हा सामुदायिक सोहळा ठेवण्याचा उद्देश आहे. आश्रमाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या संकल्पनेतून वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शांताईच्या प्रांगणात केला जाणार असून यासाठी 80 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांनी आपली नावे आश्रमाकडे सुपूर्द करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या आयुष्यात 1000 पौर्णिमा पाहिलेली व्यक्ती या सोहळ्यास पात्र ठरते. अर्थातच वयाची 80 वर्षे पूर्ण केलेली व्यक्तीच एक हजार पौर्णिमा पाहू शकते. अशा व्यक्तीच्या संदर्भात मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या वतीने सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा करण्याची पद्धत आहे. मात्र काही ज्येष्ठ नागरिकांच्या नशिबात असा सोहळा वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकत नाही.
अशा व्यक्तींसाठी आश्रमातील आजी-आजोबांच्या सानिध्यात हा सोहळा केला जाणार आहे. दरम्यान संबंधितांनी आपली नावे आश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे (9844268687) यांच्याकडे द्यावीत. असे आवाहन अध्यक्ष विजय पाटील यांनी केले आहे.