ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि जनतेकडून होणारे आपल्या आरोग्याकडील दुर्लक्ष यामुळे सातत्याने विविध आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी ग्रामीण भागातील जनतेसाठी ग्रामविकास आणि पंचायत यांच्या पुढाकारातून आरोग्य अमृत अभियान राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्तदाब हिमोग्लोबिन, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण व इतर तपासणी ग्रामपंचायत पातळीवर होणार आहे. हे अभियान आशा कार्यकर्त्या तसेच अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
यासाठी केवळ आजारी रुग्णांचीच नव्हे तर निरोगी नागरिकांची देखील रक्तदाब, मधुमेह आणि हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे. ग्रामीण भागात नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात.
प्रामुख्याने सध्या बीपी आणि शुगर चे प्रमाण वाढत असून बऱ्याच ग्रामीण भागातील नागरिकांना याची तपासणी करण्यात अडचणी येतात. त्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान सक्रियपणे राबवले जाणार आहे