उचगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी ऋचा पावशे हिने कठोर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठीच्या नीट परीक्षेत ७२० पैकी ७१५ गुण संपादन करून राज्यात दुसरा तर देशात चौथा क्रमांक मिळवून उचगावसह बेळगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल जायंट्स सखीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
रँकिंग प्रणालीमुळे ऋचाचा देशात चौथा क्रमांक आला असला तरी तिला मिळालेले गुण आणि देशात पहिला क्रमांक आलेल्या विद्यार्थिनीचे गुण सारखेच असल्याचे ज्योती अनगोळकर यांनी सांगितले. ऋचाच्या यशात तिच्या मोठ्या भावाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. भावाच्या मार्गदर्शनाखाली तिने परीक्षेचा भरपूर सराव केला होता. म्हणूनच निगेटिव्ह मार्किंग पद्धती असूनही तिने आत्मविश्वासाने परीक्षा दिली असेही अनगोळकर यांनी स्पष्ट केले.
भविष्यात ती मुलींसाठी एक आदर्श असेल असेही त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे तिच्या आईवडिलांचे कौतुक करताना एक मुलगी शिकत असताना आपण तिला प्रोत्साहन देत आहात ही महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. जायंट्स सखीच्या अध्यक्षा चंद्रा चोपडे यांनी शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन ऋचाचा सत्कार केला. तसेच भावी डॉक्टर म्हणून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर झाल्यानंतर शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी करणार असल्याचे ऋचाने सांगितले होते. म्हणूनच जायंट्स सखीने तिचा गौरव केला असल्याचे मत सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शिक्षण घेत असतानाच अंगी समाजसेवेचे गुण असल्याने तिची प्रशंसा केली. याप्रसंगी फेडरेशन संचालिका नम्रता महागांवकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, अर्पणा पाटील, माजी अध्यक्षा निता पाटील, सचिव सुलक्षणा शिन्नोळकर, ज्योती सांगुकर, राजश्री हसबे, सुवर्णा काळे दिपा पाटील, शितल पाटील, गौरी ,अर्चना उपस्थित होते.