नवरात्री निमित्त करोशी ता. हुक्केरी येथील कुलदेवतेचे दर्शन घेऊन परतताना अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी हुक्केरी येथील होळळेम्मा मंदिरानजीक ही घटना घडली.
चचडी ता. सौंदत्ती गावातील मल्लनगौडा यल्लनगौडा पाटील (वय 22) आणि सिद्धारुद्र वीरभद्र करोशी (वय 24) अशी मृतांची नावे आहेत. भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकाला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचेही निधन झाले. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांवर एकच शोककळा पसरली आहे.