No menu items!
Friday, August 29, 2025

126 वर्षांपूर्वी केवळ तेल तुपांच्या दिव्यामधील तेजोमय होणारे श्री महालक्ष्मी मंदिर

Must read

कोल्हापूर मध्ये त्याकाळी विजेची सोय नसायची. केवळ मुख्य चौका चौकात रॉकेलचे अथवा तेलाचे दिवे असायचे. अंधार पडला की लाकडी शिडीवरून ते पेटविले जायचे. कोल्हापुरात प्रथम वीज आली ती लागसेन्सी या खाजगी कंपनी मार्फत. डिझेलवर चालणाऱ्या या कंपनीचे कार्यालय तोरस्कर चौकामध्ये होते. महालक्ष्मी मंदिरातील सर्व नित्योपचार हे अशाच तेल तुपांच्या दिव्यावरच चालावयाचे.
संपूर्ण मंदिरामध्ये 43 तेलाचे दिवे तर 84 कंदील होते. 29 सप्टेंबर 1896 यावेळी जगदंबेच्या मंदिरात म्हणजेच सुमारे 126 वर्षांपूर्वी सावंत म्हणून रोशणनाईक सेवेकरी होते .त्यांच्या तत्कालीन पत्रांमधून त्या वेळेची सर्व प्रकाश व्यवस्था उजेडात आली. देवीच्या सेवेमध्ये असणाऱ्या या सेवेकरीस केवळ साडेसात रुपये पगार होता. हायमस्ट चा प्रखर उजेडात लख्ख होणारे आत्ताचे हे मंदिर केवळ तेल तुपांच्या दिव्यामध्येच भक्तीच्या अलोट ज्योती मध्ये न्हाऊन निघत असे.
देवीच्या मुख्य गर्भगृहातील सरमाळे मध्ये 43 दिवे तर बाहेर इतरत्र एकूण 84 कंदील असावयाचे. रात्री शेजारती झाल्यावर हा रोशणनाईक श्रीपूजकांकडे दोन शेर तेल देत असे. मुख्यमूर्ती पासून प्रभावळी समोरच दोन हात दुरीवर दोन पितळेचे कंदील लटकवलेले असायचे. कदाचित आजही गर्भगृहात हेच कंदील लावलेले आपण पाहतो. परंतु आत्ताच्या विजेच्या लख्ख प्रकाशात आपणच त्यांचे पूर्वीचे साक्षात जगदंबे समोर प्रज्वलित झाल्याचे कार्य विसरून गेलो. देवीच्या मूर्ती पासून हातभर अंतरावर उजवीकडे एक नंदादीप अखंड ठेवत राहावयाचा. अशा मंद प्रकाशामध्येच जगतजननी अंबाबाईचे रत्नजडित, सुवर्ण अलंकार असणारे तेजोमय रूप गर्भगृहामध्ये पहावयास मिळायचे. आई अंबाबाईच्या प्रत्येक आरती वेळी स्वतंत्र मशालीच्या उजेडाची व्यवस्था होती.
श्री महासरस्वती ,श्री महाकाली व वरच्या मजल्यावरील मातुःलिंग मंदिरात अखंड एक नंदादीप सदैव तेवत असायचा. गणपती समोर एक काचेचा कंदील तर संपूर्ण प्रदक्षिणा मार्गात पाच काचेचे कंदील होते. पितळी उंबर्या जवळील देवीच्या खजिना पाशी तर सदैव चार कंदील नेहमी तेवत असायचे. बाहेरील परिसरातील दिवे व कंदील हाच रोषणनाईक सायंकाळी सात वाजल्या पूर्वी लावत असे.
भव्य दिव्य झगमगटात प्रखर उजेडात लाखो भक्तांच्या साक्षीने सध्या होणारा देवीचा पालखी सोहळा हा त्यावेळी केवळ तीन मशालींच्या उजेडामध्ये तेवढ्याच भक्तिभावाने सदैव पार पडायचा. घाटी दरवाजा शेजारील प्रधान वाड्यामधून देवीचा नैवेद्य आणण्यासाठी व इतर सेवेसाठी हाच रोशणनाईक जात असे. करवीर संस्थानच्या छत्रपतींकडून या सर्व प्रकाश व्यवस्थेची तेलाची सोय होत असे इतकेच काय तर दररोज या सर्व तेलाचा हिशोब तंतोतंत ठेवला जात असे.

आजही देवीच्या प्रत्येक नित्योपचारात पालखी सोहळा ,आरती सोहळा, तोफेची सलामी या प्रत्येक वेळी रोशणनाईक हा सेवेकरी देवीसमोर हजर लागतोच. आजही त्याला मानाचे स्थान आहे.

( मोडी लिपी अभ्यासक व मोडीलिपी तज्ञ श्री उदयसिंह राजेयादव यांच्या श्री महालक्ष्मी दप्तर या कागदपत्रांमधून हा माहितीचा खजिना उजेडात आलेला आहे )

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!