आरटीओ सर्कल येथील घटना
चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
ब्रेक फेल झालेली एक खासगी आराम बस थेट इमारतीच्या कंपाऊंडमध्ये शिरली. आज सोमवारी सकाळी बेळगाव आरटीओ सर्कल नजीक हा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चन्नम्मा सर्कलकडून एक खासगी आराम बस आरटीओ सर्कल नजीक आली. यावेळी बसचा ब्रेक निकामी झाला. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून चालकाने बस आरटीओ सर्कल येथे असलेल्या पोलीस विभागाच्या रिकाम्या इमारतीच्या दिशेने वळविली. यावेळी इमारतीचे कंपाऊंड तोडून बस आत शिरली आणि पुढे जात भिंतीला धडक देऊन थांबली. धोका ओळखून चालकाने वेळीच बस मधून उडी घेतल्याने तो बचावला. या अपघातात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.
ब्रेक फेल झालेली ही बस आरटीओ सर्कल येथील सोन्या मारुती मंदिराला धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता होती, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.