दहावीचे वर्षं हे अत्यंत महत्त्वाचे असते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर आपण दिशा ठरवायची असते. आणि म्हणून दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडताना आपण सावधगिरी बाळगावयास हवी. कोणी सांगतो म्हणून अभ्यासक्रम न निवडता आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आपली आवड. आपला कल आणि त्याचबरोबर आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विषयाची निवड करावी, असे आवाहन प्रा. आनंद मेणसे यांनी केले.
सहकारातून सामाजिक जबाबदारी या तत्वानुसार लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटीच्या गणेशपूर शाखेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर गाईड्स या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. मेणसे बोलत होते. ते म्हणाले, कोणताही विषय चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक असते, असे सांगून त्यांनी मुलांना विविध भाषा शिकण्याचा सल्ला दिला. तसेच आपल्या भाषणात त्यांनी मुलांना विविध विषयाची ओळख करून दिली.
लोकमान्य सोसायटीचे बेळगांव विभागाचे रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर चंद्रशेखर पाटील, मराठी विद्यानिकेतनचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, समन्वयक निला आपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गणेशपूर शाखेच्या शाखाधिकारी सौ. सुनिता सातेरी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आजची पिढी हुशार व शार्प आहे. त्यांना मार्गदर्शनाची जोड मिळाली तर भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यास मदत होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सौ. सातेरी यांनी सांगितले.
सूत्रसंचालन भूषण वालावलकर व शाखा कर्मचारी श्रीकांत सुणगार यांनी केले.
मराठी विद्यानिकेतन शाळेत झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.