“तक्रारी नंतर मतदार याद्यां मराठीमध्ये उपलब्ध”
बेळगावच्या जिल्हा प्रशासनाने आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली पण सदर मतदार यादी फक्त "कन्नड" भाषेतच प्रसिद्ध करण्यात आली होती, जाणूनबूजून मराठीला प्रशासनाकडून डावलण्यात आले. यामुळे मराठी भाषिकांची गैरसोय होत होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २००८ साली विविध राज्यातील अल्पसंख्याक भाषिकांना त्यांच्या भाषेत सुविधा पुरविण्यासाठी मतदारसंघनिहाय अभ्यास केला होता. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी १६ सप्टेंबर २००८ रोजी सर्व राज्यांच्या निवडणूक आयुक्तांना संबंधित राज्यात असलेल्या भाषिक अल्पसंख्याकांना निवडणुकी संदर्भातील सर्व कागदपत्रे त्यांच्या भाषेत पुरविण्याचे सक्त आदेश दिले होते.
पण जिल्हा प्रशासनाकडून जाणूनबुजून मतदार याद्या मराठीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे दिनांक ०८ जानेवारी रोजी म. ए. युवा समितीने बेळगावच्या जिल्हाप्रशासना विरोधात केंद्रिय निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करून मतदार याद्या आणि निवडणूक संबंधित सर्व कागदपत्रे मराठीत देण्यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी केली होती. सदर तक्रारीची केंद्रिय निवडणूक आयोगाने दखल घेत, मतदार याद्या आणि इतर संबंधित कागदपत्रे मराठीत पुरविण्यासाठी बेळगावच्या जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आणि मतदार याद्यांची मराठी मध्ये छपाई करून जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोग तसेच म. ए. युवा समितीला इमेल द्वारे केली आहे.