शहरातील आश्रय फौंडेशनच्यावतीने के. के. कोप्प (ता. जि. बेळगाव) येथील धर्मापुर येथे गो-शाळा उभारण्यात येणार असून या गो-शाळेचा भूमिपूजन समारंभ काल बुधवारी उत्साहात पार पडला.
सदर भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी व प्रसिद्ध कन्नड अभिनेते व चित्रपट निर्माते अक्षय चंद्रशेखर उपस्थित होते. चंद्रशेखर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले, तर खासदारांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना खासदार अंगडी यांनी गाईंचे रक्षण करणे आणि त्यांचे पालन करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य असून आश्रय फाउंडेशन हे कार्य पुढे नेत आहे ही बाब प्रशंसनीय असल्याचे सांगून सदर कार्याला आवश्यक ते सहाय्य आपण करू असे आश्वासन दिले. अक्षय चंद्रशेखर यांनी आपले विचार व्यक्त करताना आगामी काळात आपण या गोशाळेच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून आश्रय फाउंडेशनचे हे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील समयोचित विचार व्यक्त करताना या गोशाळेच्या उत्कर्षासाठी सरकारी योजनांचा सदुपयोग करून घेतला जावा असे सांगितले. प्रारंभी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश चंद्रशेखर यांनी सर्वांचे स्वागत करून आश्रय फाउंडेशनचे ध्येय, गाईंचे महत्त्व आणि गोशाळेची उभारणी याबाबत माहिती दिली. फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकात आजच्या भूमिपूजन समारंभाचा उद्देश स्पष्ट केला. गायक संगीत निर्देशक गगनदीप यांनी प्रार्थना सादर केली. भूमिपूजन समारंभास ग्रा. पं. सदस्य सुरेश कंबी यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. सर्वांना मुक्ती मठाच्या स्वामीजींनी आशीर्वाद दिले. साहित्यिका आशा यमकनमर्डी यांनी सर्वांचे आभार मानले.