स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटुनी कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय रंकाळा तलाव खुल्या जलतरण स्पर्धेमध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने कोल्हापूर जिल्हा हौशी जलतरण संघटनेतर्फे गेल्या 23 एप्रिल रोजी कोल्हापूर येथील रंकाळा येथे राज्यस्तरीय रंकाळा तलाव जलतरण स्पर्धा -2023 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्वीमर्स आणि एक्वेरियस क्लबच्या अनिश पै याने मुलांच्या गट श्रेणी 3 साठी असलेल्या 1.5 कि.मी. अंतराच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावण्याबरोबरच त्या गटातील सर्वात जलद जलतरणपटू होण्याचा सन्मान मिळविला. बेळगावच्या इतर जलतरणपटूंनी सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून पुढील प्रमाणे यश मिळविले. विहान कोरी 1.5 कि. मी. चौथा क्रमांक, अनन्या पै 3 कि.मी. पाचवा क्रमांक, भगतसिंग गावडे 750 मी. सातवा क्रमांक आणि अथर्व राजगोळकर 1.5 कि.मी. दहावा क्रमांक.
उपरोक्त सर्व जलतरणपटू शहरातील सुवर्ण जीएनएमसी जलतरण तलावामध्ये होण्याचा सराव करतात. त्यांना प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांसह केएलई संस्थेचे अध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, माणिक कापाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.