गेल्या दोन दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याला गणेशपूर येथे अडवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते ही घटना ताजी असतानाच एका तोतया पोलिसांकडून श्रीनगर गार्डन जवळ देखील दागिने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत महांतेश नगर येथील 65 वर्षीय रहिवासी बसाप्पा कोडगनुर यांनी माळ मारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की बसप्पा हे कामानिमित्त बाहेर पडले असता दुचाकीवरून घराकडे निघाले होते यावेळी पाठीमागून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. तसेच त्यांना या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असल्याने तुम्ही कोणत्याही प्रकारचे दागिने येथून घालून जाऊ नका असे सांगितले. आम्ही पोलिस आहोत त्यामुळे जनतेच्या सुरक्षिततेची काळजी आमच्यावर आहे .असे सांगून बोलण्यात त्यांना गाफील केले.
तसेच त्यांच्या अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवतो असे सांगून त्यांच्याजवळील रुमाल घेतला आणि त्यांच्या हाताच्या बोटातील अंगठ्या त्यातील सोनसाखळी मोबाईल व मनगटी घड्याळ ही काढायला लावले लक्ष विचलित करून रुमाल मध्ये फक्त मोबाईल व घड्याळ तितकेच ठेवत चोरट्यांनी दागिने मात्र आपल्या खिशात घातले .
यावेळी बसप्पा यांनी थोड्या अंतरावर जाऊन पाहिले असता रुमालात फक्त घड्याळ आणि मोबाईल असल्याचे आढळून आले. त्यामुळे बसाप्पा यांनी या घटनेची तक्रार माळ मारुती पोलीस स्थानकात केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत शहरात झालेल्या या दोन चोऱ्यांमुळे पोलिसांना या चोरट्यांना गजाआड करणे आव्हानात्मक ठरले आहे.