हिंदुस्थानच्या इतिहासात महाराणा प्रताप हे प्रातःस्मरणीय आहेत. स्वदेश, स्वधर्म, संस्कृती, स्वाभिमान, आणि स्वातंत्र्य यांच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावणार्या शूरवीरांच्या परंपरेत यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. महाराणा प्रतापसिंहांचे त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्मरण करूया !
महाराणा प्रतापांचे बालपण-
मेवाडचे मेरुमणी ‘महाराणा प्रताप’ हे नाव सर्वश्रुत आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासात प्रेरणादायक असलेल्या महाराणा प्रतापांचे नाव साहस, शोर्य, त्यागाचे प्रतीक आहे. मेवाडच्या सिसोदिया वंशात बाप्पा रावळ, राणा हमीर, राणा संग इत्यादी अनेक शूरवीरांचा जन्म झाला आहे. या महान वंशातच १५४०साली महाराणा प्रतापांचा जन्म झाला. ते मेवाडचे राणा उदयसिंह (द्वितीय) यांचे ज्येष्ठपुत्र होते. स्वाभीमान आणि सदाचार हे प्रतापसिंहांचे प्रमुख गुण होते. लहानपणापासूनच त्यांना मैदानी खेळ आणि शस्त्रास्त्रे चालविण्याची आवड होती.
महाराणा प्रताप यांचा पट्टाभिषेक –
रजपूत वंशात पित्यानंतर ज्येष्ठ पुत्रालाच राजगादीवर बसविण्याची प्रथा होती. उदयसिंह यांच्या आणखी एका राणीची तिचा मुलगा जगमल्ल राजा व्हावा, अशी इच्छा होती; परंतु जगमल्ल प्रतापसिंहांसारखा शूर, स्वाभीमानी आणि साहसी नव्हता. त्यामुळे सर्व सरदारांच्या आणि मेवाडच्या जनतेच्या प्रबळ आग्रहाला मानून प्रतापसिंहांनी राज्याभिषेक करून घेतला.
मातृभूमीला मुघल मुसलमानांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी कठोर प्रतिज्ञा करणे –
मेवाडच्या चारीही सीमांवर मुघल मुसलमानांनी वेढा घातला. महाराणा प्रतापसिंहांचे दोन लहान भाऊ शक्तीसिंह आणि जगमल्ल अकबराच्या कह्यात होते. शत्रूशी लढा देण्यासाठी बलशाली सेना उभी करणे, ही महाराणा प्रताप सिंहांची प्रथम समस्या होती. त्यासाठी अपार धनाची आवश्यकता होती. महाराणा प्रतापसिंहांची ओंजळी रिकामी होती. या उलट अकबराकडे बलाढ्य सैन्य, अपार संपत्ती आणि मूलतः भारतीय वंशाचेच असलेले आणि विरोधी असलेले अनेक हिंदू सरदार होते. अशा कठीण परिस्थितीत देखील महाराणा प्रताप विचलीत अथवा निराश झाले नाहीत. त्यांनी ‘आम्ही अकबरापेक्षा दुर्बल आहोत,’ असे निराशेचे उद्गार कधीच काढले नाही. आपल्या मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त कसे करायचे ही एकच इच्छा त्यांच्यात असायची.
एक दिवस महाराणा प्रतापसिंह यांनी आपल्या विश्वासू सरदारांना एकत्र करून सांगितले की, माझ्या शूर रजपूत बांधवांनो आपली मातृभूमी, पूण्यभूमी मेवाड मुसलमानांच्या कह्यात आहे. आज मी तुमच्यापुढे प्रतिज्ञा करतो की, चित्तोड स्वतंत्र होईपर्यंत मी सोन्या-चांदीच्या ताटात जेवणार नाही. मऊ बिछान्यावर झोपणार नाही, राजवैभवाचा उपभोग घेणार नाही, त्या ऐवजी मी पत्रावळीत जेवीन, भूमीवर झोपीन आणि झोपडीत राहीन ! शूर सरदारांनो, चित्तोड स्वतंत्र करण्याची माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तन-मन-धनाने तुम्ही साहाय्य कराल, याचा मला विश्वास आहे. प्रतापसिंहांची ही कठोर प्रतिज्ञा ऐकून तिथे उपस्थित सर्व सरदारांमध्ये उत्साह दाटून येऊन ते एका सुरात म्हणाले की, हे राजा , आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चित्तोडच्या मुक्तीसाठी तुम्हाला साहाय्य करू आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देऊ ! आम्ही मरण स्वीकारू; परंतु ध्येयापासून दूर जाणार नाही. महाराणा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
हळदीघाटी युद्ध –
महाराणा प्रतापसिंहांना फसवून आपला गुलाम बनविण्यासाठी अकबराने पुष्कळ प्रयत्न केले; परंतु ते व्यर्थ गेले. शेवटी अकबराने महाराणा प्रतापसिंहांना पराभूत करून अटक करण्यासाठी आपला पुत्र सलीम (जहांगीर) याच्या नेतृत्वाखाली बादशाही सैन्य पाठविले. अकबराला शरण गेलेले जयपूरचे राजा मानसिंग आणि धर्मांतरीत झालेले रजपूत सरदार महाबतखान आपल्या सैन्यासह महाराणा प्रतापसिंहांवर चालून गेले. महाराणा प्रतापांचे २८ सहस्र सैन्य आणि अकबराचे १ लक्ष सैन्य हळदीघाटीत समोरासमोर आले. लढण्याच्या आवेशात महाराणा प्रतापसिंह आपल्या घोड्यावरून सरळ सलीमच्या हत्तीवर चालून गेले. इतिहास प्रसिद्ध ‘चेतक’ या घोड्याने न घाबरता सलीमच्या हत्तीवरच उडी मारली. महाराणा प्रतापसिंहानी बर्ची चालविली. सलीम माहुताच्या मागे लपल्याने बर्ची माहुताला लागून तो मरण पावला. सलीम केवळ चमत्कारामुळेच वाचला.
सहस्रो मुसलमान सैनिकांचा वेढा असलेल्या सुरक्षा कवचाला भेदून सरळ सेनापतीवरच हल्ला करणार्या राणा प्रतापसिंहांचे शौर्य आज देखील प्रत्येक हिंदूला रोमांचित करते ! धर्मासाठी प्राणपणाला कसे लावायचे हे शिकवते ! महाराणा प्रतापसिंह येऊन विजेच्या वेगाने निघून गेले. या युद्धात चेतक पुष्कळ घायाळ झाला होता; तरीही त्याने आपल्या स्वामीचे जीवन वाचविण्यासाठी एक मोठा ओढा पार करण्यासाठी उडी मारली. ओढा पार करून पलीकडे भूमीवर पाय ठेवताच चेतकाचा प्राण गेला. चेतकाच्या मृत्यूमुळे महाराणा प्रतापसिंह पुष्कळ दुःखी झाले. चेतकाने प्राणत्याग केलेल्या ठिकाणी महाराणा प्रतापसिंह यांनी एक सुंदर उद्यान उभारले. त्यानंतर आलेल्या अकबराला स्वतः ६ मास युद्ध करून देखील महाराणा प्रतापसिंह यांचा पराभव करता आला नाही. अकबर रिकाम्या हाताने देहलीला परत गेला. शेवटचा प्रयत्न म्हणून अकबराने १५९४ला महापराक्रमी सेनापती जगन्नाथ याला मोठे सैन्य देऊन मेवाडवर आक्रमण करण्यासाठी पाठविले. २ वर्षे पुष्कळ प्रयत्न करून देखील महाराणा प्रतापसिंह यांना पकडणे त्याला देखील साध्य झाले नाही.
दैवाची कठोर परीक्षा
राना-वनात भटकत असताना महाराणा प्रतापसिंह यांचे कुटुंबीय त्यांच्यासह रहात होते. शत्रू कोणत्याही क्षणी पाठलाग करू शकतो, ही भीती त्यांना असायची. अरण्यात आहार नसल्याने पुष्कळ उपासमार होत असे; परंतु शत्रू येत आहे, अशी वार्ता येताच समोर असलेले अन्न टाकून जावे लागत असे. एक दिवस महाराणी जंगलात रोटी बनवत असताना सर्वांनी आपापल्या वाट्याची रोटी खाल्ली. महाराणीनी आपल्या मुलीला अर्धी रोटी खाण्यास सांगितले. आणि उरलेली रोटी रात्रीसाठी बांधून ठेवण्यास सांगितले. तेवढ्यात एका जंगली मांजराने येऊन तिच्या हातातील रोटी पळवून नेली. राजकुमारी असहाय्य होऊन रडू लागली. आज तिच्या नशिबी रोटीचा एक तुकडा देखील नव्हता. हे दृश्य पाहून वज्र हृदयी महाराणा प्रतापसिंह देखील किंचित विचलीत झाले. हे सर्व वाया जात आहे का ? असे त्यांना वाटले. या मानसीक गोंधळाच्या अवस्थेत त्यांनी अकबराशी तह करण्याचा निर्णय घेतला. (अनेक इतिहासकार म्हणतात की, अकबराला झुलविण्यासाठी बोलणी करण्यास प्रारंभ करणे हे एक तंत्र होते.) अकबराच्या दरबारात महाराणा प्रतापसिंह यांचे हितैषी असलेले राजकवी पृथ्वीराज यांनी महाराणा प्रतापसिंह यांना राजस्थानी भाषेत कवितेच्या रूपात एक मोठे पत्र लिहून तहाच्या विचारापासून दूर केले. कवी पृथ्वीराजाच्या या पत्राने महाराणा प्रतापसिंह यांना १०सहस्र सैनिकांचे बळ मिळाल्यासारखे वाटले. त्यांचे विचलीत झालेले मन स्थिर झाले. अकबराशी तह करण्याचा विषय त्यांनी मनातून काढून टाकला. अधिक तीव्रतेने आणि दृढतेने सैन्य संग्रह करून आपले ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नात ते मग्न झाले.
भामाशाहची स्वामी भक्ती-
भामाशाह नावाचा राजपूत सरदार महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्वजांच्या राजसभेत मंत्री होता. आपल्या आपल्या स्वामींना अरण्यात रहावे लागत आहे, हे त्याच्या मनाला टोचत होते. महाराणा प्रतापसिंहांची परिस्थिती पाहून भामाशहाचे मन कळवळले. त्याने २५ सहस्र सैनिकांचे १२ वर्षे पालन पोषण करता येईल एवढी संपत्ती स्वामींच्या चरणी अर्पण केल्यावर महाराणा प्रतापसिंह यांना कृतज्ञता दाटून आली. प्रारंभी महाराणा प्रतापसिंह यांनी भामाशाहाची संपत्ती नम्रतेने नाकारली; परंतु भामाशहाच्या मनःपूर्वक आग्रहानंतर त्यांनी ते स्वीकारले. भामाशहाच्या देणगी नंतर महाराणा प्रतापसिंह यांना अनेक ठिकाणांहून पैसा येऊ लागला. त्याचा उपयोग करून त्यांनी आपले सैन्यबळ वाढविले आणि संपूर्ण मेवाड प्रांत स्वतंत्र केला; परंतु अजून चित्तोड मुसलमानांच्या ताब्यातच होते.
अखेरची इच्छा –
महाराणा प्रतापसिंह यांची मृत्यूशैया देखील गवताचीच होती. शेवटचा श्वास घेईपर्यंत (१५९७) मऊ शैयेवर झोपले नाहीत; कारण चित्तोड स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली नव्हती. शेवटच्या क्षणी आपला पुत्र अमरसिंह याचा हात धरून त्यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे दायीत्व त्याच्यावर सोपवून शांतपणे प्राण त्याग केला. अकबरासारख्या क्रूर बादशहासह महाराणा प्रतापसिंह यांनी दिलेला लढा या सारखे इतिहासात दुसरे उदाहरण नाही. अल्पाधिक प्रमाणात संपूर्ण राजस्थान अकबराच्या कह्यात गेले असताना महाराणा प्रतापसिंह यांनी आपल्या लहानशा मातृभूमीसाठी २५ वर्षे लढा दिला. बादशहाने पुष्कळ प्रयत्न केला; परंतु महाराणा प्रतापसिंह शेवटपर्यंत अजिंक्य राहिले. एवढेच नव्हे तर त्यांनी मुघल मुसलमानांच्या ताब्यातून राजस्थानची पुष्कळ भूमी स्वतंत्र केली. अपार कष्ट सहन करून त्यांनी आपल्या कुळावर आणि राष्ट्राच्या प्रतिष्ठेवर आघात होऊ दिला नाही. ‘स्वातंत्र्य’ या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे महाराणा प्रतापसिंह असे होण्याइतके त्यांचे जीवन तेजस्वी आहे. हिंदुस्थानात जोपर्यंत वीरांची पूजा होईल तोपर्यंत महाराणा प्रतापसिंह यांचे चरित्र हिंदूंना स्वातंत्र्य आणि देशाभिमानाचा पाठ शिकवत राहील !
जिल्हा समिती स्वयंसेवक: श्री. सुधीर हेरेकर
संपर्क क्रमांक :९८४५८३७४२३