नवी दिल्ली, 16 : गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या इफ्फीच्या 54 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने केली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन तसेच क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा भव्य सोहळा असणार आहे.
इफ्फी-54 मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, बु्द्धिजीवी आणि जागतिक चित्रपट रसिकांपैकी एक होण्याचा बहुमान मिळणार आहे.
माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाइन मीडिया संस्थेशी संबंधित कार्य असणे आवश्यक असण्याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या बातमीपत्रात म्हटले आहे. वयाची अट पूर्ण करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांनाही (फ्रीलान्सर्स) नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रिया अगदी सहज असून https://my.iffigoa.org/extranet/media/ येथे ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकेल.
‘इफ्फी’ला यशस्वी करण्यासाठी, सिनेमाच्या कौतुकाची संस्कृती जोपासण्यात आणि चित्रपट निर्मिती कलेविषयी खऱ्या अर्थाने प्रेम जोपासण्यात माहिती आणि संवाद महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या महोत्सवासाठी नोंदणी करण्यासाठी आणि उपस्थित राहण्याच्या आमंत्रणाबरोबरच प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने इफ्फीच्या उत्सवात हातभार लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सिनेमाचा निखळ आनंद आणि या चित्रपटांनी विणलेल्या मनोरंजक कथा, त्यांच्या निर्मात्यांच्या आयुष्याची, स्वप्नांची, आकांक्षांची आणि संघर्षाची अनोखी झलक दाखवणारे हे प्रदर्शन 54 व्या इफ्फीत दाखवण्यात येणार आहे. चित्रपटांचा उत्सव केवळ पडद्यापुरता मर्यादित न राहता त्या पलिकडेही इफ्फी आणि इतर गाजलेल्या चित्रपट महोत्सवांचे सार स्पष्ट करणारे मास्टरक्लासेस, पॅनेल चर्चा, सेमिनार आणि संभाषणांची मेजवानी देखील मिळणार आहे.
नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही शंका असल्यास, कृपया येथे दिलेल्या मार्गदर्शक सूचना इथे (https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/oct/doc20231011259501.pdf ) आणि नोंदणी दुव्यावर पहा. अधिक मदतीसाठी पीआयबीशी ईमेलद्वारे pib.goa[at]gmail[dot]com वर किंवा +91-832-2956418 या क्रमांकावर फोनद्वारे संपर्क साधावा. सर्व कामकाजाच्या दिवशी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत फोनलाइन सक्रिय असेल. नोंदणीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11:59:59 (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निश्चित करण्यात आली आहे.
54 व्या इफ्फीच्या ताज्या घडामोडी व अधिक माहितीसाठी, www.iffigoa.org येथे महोत्सवाच्या वेबसाइटला भेट द्या.