बेळगाव:
येथील शब्दगंध कवी मंडळाचा ३३वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयात होणार आहे. प्रा अशोक आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या कार्यक्रमात कवी आबासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
परिचय-
कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावचे आबासाहेब पाटील यांचे शिक्षण मराठी विषयातून एम ए पर्यंत झाले असून ते शेती व मजुरी करतात. राबणाऱ्या कष्टकरी-शेतकऱ्याच्या व्यथा मांडणारा संवेदनशील कवी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे आतापर्यंत दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘साध्या माणसाच्या कविता’ हा त्यांचा पहिला कविता संग्रह २०१० साली प्रसिद्ध झाला असून या संग्रहाला अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचा दुसरा कविता संग्रह ‘घामाची ओल’ हा २०२२ रोजी प्रसिद्ध झाला असून समीक्षकांनी यातील कवितांचे भरभरून कौतुक केले आहेत. याही संग्रहाला दहाहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
यासोबत आबासाहेबांच्या कविता अनेक महत्त्वाच्या दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.सांगली व कोल्हापूर आकाशवाणीवरून त्यांनी काव्य वाचन केले आहे. विविध दुरचित्र वाहिन्यांवर देखील काव्य वाचन केले आहे. सीमाभागात होणाऱ्या बहुतेक साहित्य संमेलनात कवी म्हणून सहभाग घेतलेला आहे. यासह महाराष्ट्रातील अनेक कवी संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
शब्दगंधच्या वर्धापनदिन कार्यक्रमात आबासाहेब पाटील यांच्या कविता ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या हस्ते ‘शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेतील’ विजेत्या कवींना रोख रक्कम, स्मृती चिन्ह आणि काव्य संग्रह भेट देऊन गौरविण्यात येणार आहे. मराठी भाषा प्रेमी आणि काव्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दगंध कवी मंडळाचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.