बेळगाव – गेल्या काही वर्षांत भारतामध्ये अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या भीषण घटना घडल्या आहेत आणि त्या आयोजकांसाठी, प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी धडा ठरल्या आहेत. दरवेळी अशा दुर्घटना घडल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी चौकशी समित्या स्थापन होतात, त्या अहवाल सादर करतात. त्यातून गर्दी नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे पुढे येतात. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यामुळे पुन्हा दुर्घटना घडत राहतात. प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्घटनेनंतर या मालिकेत नवा अध्याय जोडला गेला आहे.चाळीस दिवस चालणार्या महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रयाग्रज कुंभमेळ्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत.या दुर्घटनां पासून शासन,प्रशासन आणि भाविकांनी कोणताच धडा घेतलेला दिसत नाही.किंबहुना श्रद्धा भक्तीच्या नावावर कुंभमेळ्यात बेहाल परिस्थिती पाहायला मिळत आहे असे मत, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते डॉक्टर गणपत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
डॉक्टर गणपत पाटील यांनी प्रयागराज येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील परिस्थिती संदर्भात पुढे बोलताना डॉक्टर पाटील म्हणाले,प्रयागराजच्या कुंभमेळ्याची जबाबदारी उत्तर प्रदेशात सत्तेत असणार्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर आहे. सरकारने व्यापक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे. परंतु प्रचंड गर्दी, ढिसाळ व्यवस्थापनामुळे कुंभमेळ्यातील संकट टाळता आले नाही. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे आयोजनात उणिवा राहिल्या हे स्पष्ट झाले. अशा प्रकारच्या घटनेला कोणा एकाला जबाबदार धरता येणार नाही. कारण लहान सहान चुकांची जेव्हा गोळाबेरीज होते तेव्हा अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागते.
2025 चा महाकुंभमेळा वैशिष्ट्यपूर्ण असल्याची जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत कुंभमेळ्यापासून दूर राहणारे ही प्रयागराजला पोहोचण्यासाठी धडपड करू लागले. त्यातूनच कुंभमेळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम, धार्मिक विधी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीचा अंदाज घेत, वाहनतळ, मार्ग वळविणे, बॅरिकेडिंग, पोलिसांची नियुक्ती आदी गोष्टींबाबत योगी सरकारचे प्रशासन दक्ष आहे, असे सांगितले जात होते. प्रत्यक्ष महाकुंभातही सर्व काही ऑलबेल असल्याचे सांगितले जात होते.परंतु घडलेल्या दुर्घटनेमुळे या सर्वांवर पाणी फेरले गेले.
मौनी अमस्येला घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रयागराज कडे येणारा भाविकांचा ओढा कमी होईल अशी शक्यता होती मात्र ही शक्यता फोल्ड ठरली किंबहुना त्या दुर्घटनेनंतरही प्रचंड संख्येने लोक प्रयागराज कडे येण्यासाठी धडपड करू लागले प्रयागराज मध्ये अभुतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. वाढलेल्या प्रचंड गर्दीमुळे प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन बंद करण्याची वेळ आली.प्रयागराज पासून बऱ्याच अंतरांवर भाविकांना आपली वाहने दुर थांबवून तब्बल वीस ते पंचवीस किलोमीटर पायपीट करून संगमापर्यंत पोहोचण्याची वेळ आली.यातच उद्भवलेल्या परिस्थितीचा अनेकांनी गैरफायदा घेण्याचा सपाटाच लावला. खाजगी वाहनधारक, नदीतील नाव चालवणारे अव्वाच्या सव्वा रक्कम भाविकांकडून मागत आहेत. प्रयागराज कडे जाणाऱ्या विमानांचे दरही गगनाला पोहोचले. शासनाने श्रीमंत वर्ग आणि व्हीव्हीआयपी साठी विशेष व्यवस्था केल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. श्रीमंत वर्ग आणि व्हीआयपी सुलभपणे कुंभमेळ्याचा आनंद घेत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्वसामान्य भाविक अनेक अडीअडचणींचा सामना करत कुंभमेळ्यातील पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करत आहेत. भाविक किंवा गर्दीस्थळी जमणारा समुदायही सुरक्षिततेच्या मुद्द्याचा विचार करत नाही. त्यामुळे अनर्थ घडणेही टळत नाही. याचा आता प्रत्येकानेच गंभीर आणि डोळसपणे विचार करणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टर गणपत पाटील यांनी व्यक्त केले आहे.