येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे आयोजित सतराव्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी उत्साहात पार पडले. शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी वेगवेगळे किस्से, विनोद आणि कविता सादर करीत राधानगरीच्या संभाजी यादव यांनी प्रचंड हशा आणि टाळ्या मिळवीत येळळूर मधील रसिक जनतेला आपल्या हास्य दरबारात रंगवून ठेवले. साहित्य संमेलनातील दुसरे सत्र हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा सादर करताना संभाजी यादव यांनी जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्यांशी चांगलं बोलायला हवं, चांगले वागायला हवं हे करीत असतानाच जीवनातील आनंद टिपायला शिका कारण हसण्यासाठी जन्म आपला रडण्यासाठी नाही, दिस उद्याचा कोणी पाहिला जगण्याचा काही नेम नाही असे सांगत भाषेच्या विविध गमतीजमती, व्यसनमुक्ती, संगीतावर नाचणारी मुले आणि स्त्रिया, अंधश्रद्धा रूढी-परंपरा यांच्याकडून निर्माण होणारे विनोद सांगत यातून आनंद मिळवायला शिका असे सांगितले.
तसेच मराठीतील अभिनेते दादा कोंडके, अशोक सराफ, श्रीराम लागू, निळू फुले, गणपत पाटील हे एकत्रित जात असताना काय गमती जमती होतात हे त्यांच्या आवाजात सांगितले. अमिताभ बच्चन अमीन सयानी व शरद पवार यांच्याही आवाजाची मिमिक्री त्यांनी सादर करून लोकांची वाहवा मिळविली. कन्नड व मराठी भाषा बोलणाऱ्याच्या संवादातून कशा गमती जमती होतात याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच अडाणी व सुशिक्षित लोकांच्या बोलण्यातून ही कसा विनोद निर्माण होतो याची उदाहरणे दिली.
ऑर्केस्ट्रामध्ये वाजविल्या जाणाऱ्या विविध वाद्यांचा आवाज त्यांनी आपल्या तोंडातून काढून दाखविला.त्याच्या हुबेहूब पणामुळे लोकांनी त्यांचे कौतुक केले. मनोरंजनातून समाजप्रबोधन करण्याचं काम काही कलाकारांनी केले आहे त्यामुळे दादा कोंडके यांना नाक मुरडून चालणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले.काही मंडळी घरातील वडीलधाऱ्यांना कुठेही फिरायला नेणे कमीपणाचे समजतात परंतु उघड्या अंगाच्या कुत्र्याला घेऊन जाताना कशा गमतीजमती घडतात हे सांगून त्यांनी लोकांना हसविले.
वरात काढण्यामध्ये गावातील नवीन सुनेची ओळख सर्वांना व्हावी हाच उद्देश असतो परंतु आता हे मागे पडून नव दाम्पत्याला कारमध्ये आत बसवून त्यांच्या गाडीसमोर नाचणाऱ्यानाच पाहण्याची वेळ लोकांच्यावर कशी आली आहे हे त्यांनी विनोदी पद्धतीने सादर केले..
गाडीच्या पाठीमागे लिहील्या जाणाऱ्या वाक्यांमुळे कसे विनोद निर्माण होतात किंवा चित्रपट पाहायला गेलेल्या नवरा-बायकोच्या मध्ये कसा संवाद घडतो, चुकीचे इंग्लिश बोलले तर अर्थाचा कसा अनर्थ होतो हे सांगून त्यांनी हशा टाळ्या मिळविल्या. कोणतीही गोष्ट फुकट मिळाली पाहिजे या हव्यासापोटी नारळाच्या झाडावर चढलेल्याची कशी पंचाईत होते हे त्यांनी विनोदी पद्धतीने सांगितले. असे विनोद घेऊनच आपण माणसात राहू या, आनंदात राहू या आणि मनाची मशागत करुन आनंदी जीवन जगू या असा उपदेशही त्यांनी केला .
याप्रसंगी विजयकुमार दळवी यांनी बोलीभाषा रुजविणे काळाची गरज आहे असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डी जी पाटील ग्रामपंचायत माजी सदस्य रमेश धामणेकर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर सदस्य प्रमोद पाटील शांता काकतकर महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बबन कानशिडे बाबागौडा पाटील,डॉ गणपत पाटील ,दुद्दप्पा बागेवाडी ,शिवाजी सायनेकर ,रघुनाथ मुरकुटे ,बाबुराव मुरकुटे ,शांताराम कुगजी ,प्रकाश पाटील ,संजय मासेकर ,कल्लापा भोगण आदी उपस्थित होते.