देहदानाच्या संकल्पामुळे समाजासमोर निर्माण केला आदर्श!
शारीरिक व्यंग असूनही काहीतरी विशेष करून दाखवणाऱ्या माणसांची उदाहरणे आपल्या आजूबाजूला अनेक आढळतात. कोणी गीत गायनात वेगळेपण दाखवतं तर कोणी वादन कलेत निपुण असतं. तर कोणी जागतिक जलतरण पटू म्हणून कीर्ती मिळवत तर कोणी पायांनी चित्र काढण्यात पारंगत असतं. अपंगत्वावर मात करत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींकडून समाज नेहमीच प्रेरणा घेत असतो. ऊर्जा मिळवत असतो. शारीरिक व्यंगाचा बाऊ न करता स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करून प्रत्यनवी दृष्टी देण्याचं काम या व्यक्ती करत असतात. बेळगाव तालुक्यातील अशाच एका तरुणाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पायाने ५५ टक्के अपंग असलेल्या बस्तवाड (हलगा) येथील सागर मरगाणाचे या तरुणाने आपल्या शरीराचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी देहदानाचा संकल्प केला आहे. लहानपणी आलेल्या एका आजारामुळे त्यांचा एक पाय अधू झाला. असे असूनही त्यांनी उच्च शिक्षण घेतले. वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव निर्माण झाली. याच हेतूने त्यांनी अनाथाश्रमाना अनेकवेळा मदत केली आहे.
एकदा वृत्तपत्रामध्ये एका आजीने देहदान केल्याची बातमी सागर यांनी वाचली आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपणही देहदान करायला हवे असे त्यांनी ठरवले .जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यायातील शरीररचनाशास्त्र विभागात जाऊन त्यांनी हा देहादानाचा संकल्प केला आहे.
तसेच त्यांना महाविद्यालयाकडून प्रशंसा पत्र प्राप्त झाले आहे.या त्यांच्या देहदानाच्या संकल्पना विषयी सागर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ कित्येक लोक आर्थिक मदत करतात, कपडेदान, अन्नदान करून सामाजिक बांधिलकी जपतात. मला यापेक्षा वेगळे काहीतरी करायचे होते म्हणून मी देहदान करण्याचा संकल्प केला, जेणेकरून माझ्या मृत्यूनंतरही माझ्या शरीराचा उपयोग समाजाला होईल असे त्यांनी सांगितले
देहादानाच्या संकल्पामुळे सागर मरगाणाचे यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यायला हवा असे बोलले जात आहे.