गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारी मराठी मुलांची शाळा क्र.27 शिवाजीनगर येथील मुलांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य देण्यात आले.या शाळेतील मुलांचे पालक हा कामगार वर्ग असून हलाखीच्या परिस्थितीतही ते आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झटत आहेत.त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी एक स्कुल बॅग,अर्धा डझन वह्या,पेन,पेन्सिल, रबर, शापनर,पट्टी असे शालोपयोगी साहित्य देण्यात आले.
यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर,कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे,अमर एच,राजू भोसले,अवधूत तुडवेकर,शाळेच्या मुख्याध्यापिका के. पी. मेलगे,सौ.एस.आर.मुतगेकर,इतर शिक्षक व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
त्यावेळी संतोष दरेकर म्हणाले की उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अनेक संस्था सत्कार करतात आणि त्यांना पारितोषिके देतात.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे ही चांगली गोष्ट आहे पण प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील गुणवंत म्हणूनच ओळखले जावेत असे मला वाटते.अनेक शाळांमध्ये अशी उदाहरणे पाहायला मिळतात.शिक्षण घेण्याची तळमळ असणाऱ्या परंतु आर्थिक समस्येला तोंड देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .अनेकांचे पालक गवंडी,प्लंबर,वाचमन,मजुरी , सफाई कामगार म्हणून काम करत आहेत.त्यांची इच्छा आपल्या मुलाने खूप शिकावे अशीच इच्छा असते.आपल्या वाट्याला आलेला त्रास,संघर्ष मुलांना भोगायला लागू नये म्हणून ते मुलांना काहीही करून शिक्षण देतात.अशा गरीब कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजानेच मदतीचा हात देणे आवश्यक आहे.आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण ऋण फेडले पाहिजे या भावनेने प्रतेक व्यक्तीने अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाना मदत केली पाहिजे.
या मदतीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मेलगे मॅडम यांनी आभार मानले