बेळगाव :
भारतीय रिझर्व बँकेने दहा रुपयांचे नाणे हे अधिकृत चलन म्हणून 2016 साली घोषित केले. मात्र याचा वापर बेळगाव जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांनी अद्यापही केला नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यात दहा रुपयाचे नाणे कोठेच चलनात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दहा रुपयांच्या नाण्यांचा स्वीकार करावा यासाठी परिपत्रक अथवा प्रसिद्धीपत्रक काढून जनजागृती करावी अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या बाजारपेठेत दहा रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बँका नोटां ऐवजी दहा रुपयांची नाणी वितरित करत आहेत मात्र बाजारपेठेत दहा रुपयांच्या नाण्यांना कोणीही स्वीकारत नसल्याने अनेकांकडे दहा रुपयांच्या नाण्यांचा खच पडला आहे. त्यामुळे सदर दहा रुपयाचे नाणे चलनात आणण्यासाठी सरकारने जनजागृती करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबरोबरच टिळकवाडी येथील तीस रेल्वे गेट च्या ब्रिजचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील काम पूर्ण करण्यात यावे यासाठी खासदार मंगला अंगडी रेल्वे अधिकारी कंत्राटदार आणि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिले होते.मात्र आता काही दिवस उलटले तरी या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे तिसऱ्या रेल्वे गेटचे काम विविध पातळीवर सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदन बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या शिष्टमंडळाने अध्यक्ष रोहन जुवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी त्यांच्यासोबत हेमंत पोरवाल आणि बीसीसीआयचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.