मच्छे मधील लक्ष्मीनगर, नेहरू नगर आणि मच्छे येथील मुख्य थांब्यावर परिवहन मंडळाच्या एक्सप्रेस बसेस थांबत नसल्याने परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाशांना पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागत आहे.
दिनांक २४/११/२०२२ रोजी परिवहन मंडळाची केए ४२एफ१३१५ रामनगर बेळगाव ही बस खाली जात होती .लक्ष्मीनगर व मच्छे येथे बरेच विद्यार्थी होते त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला पण चालकाने बस तशीच पुढे हाकली आणि पिरनवाडी येथे थांबविली. सदरची बाब युवा समिती ने ट्विटर द्वारे परिवहन मंडळाच्या निदर्शनास आणून दिली आणि परिवहन मंडळाने त्यावर कार्यवाही करू अशी माहिती ट्विटर वर दिली आहे.
सप्टेंबर महिन्यात मध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर परिवहन मंडळाने सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात बसेस च्या दोन फेऱ्या वाढवू तसेच लांब पल्ल्याच्या बसेस मध्ये पासधारक विद्यार्थी ना अनुमती देऊ असे पत्रक परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी दिले होते. पण आंदोलन निवळताच बस फेऱ्या वाढविल्या नाहीत आणि लांब पल्ल्याच्या बसेस देखील मच्छे मध्ये थांबत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी वर्गातून होत आहेत.
झाडशहापूर आणि मच्छे परिसराला स्वतंत्र अशी बस सेवा नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांना देसूर, गर्लगुंजी, आणि खानापूर या बस सेवा वर अवलंबून राहावे लागते, या मार्गावरून शेकडो बसेस बेळगाव हुन कारवार, हळीयाळ, कुमठा, दांडेली आणि गोवा ला जातात पण या लांब पल्याच्या बसेस मध्ये वाहकांकडून विद्यार्थंना अटकाव केला जातो हीच बाब परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली आणि सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात या मार्गावरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विंनती केली होती. तेव्हा अधिकाऱ्यांनी पत्रक काढून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ असे सांगितले होते पण आंदोलन निवळताच आश्वासन हि हवेत विरले.
विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संतापाचे वातावरण आहे आणि जर ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास परिवहन मंडळाविरोधात पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलनच्या पावित्र्यात आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही जबाबदारी परिवहन मंडळाची असून विर्द्याथ्यांच्या बस संबंधित समस्या प्राधान्याने सोडविल्या जाव्यात अशी मागणी युवा समिती ने केली आहे.