नानावाडी येथील अंगडी कॉलेज समोरील अर्धवट अवस्थेतील काँक्रीटच्या धोकादायक रस्त्यापासून वाहन चालकांना सावध करण्यासाठी यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे तेथे लाल बावट्याची फीत बांधण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.नानावाडी येथील अंगडी कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र हे करताना सदर कॉलेज समोर येईल रस्त्याच्या एका बाजूच्या कांही मीटर भागाचे कॉंक्रिटीकरणच करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी धोकादायक खड्डा निर्माण झाला होता. वाहनावरून जाताना जवळ गेल्या खेरीज दुरून सहजासहजी न दिसणारा हा खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता. याची दखल घेत युवा सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील यंग बेळगाव फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अर्धवट रस्त्याच्या ठिकाणी तिन्ही बाजूने लाल फीत बांधून या मार्गावरून ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना त्या धोकादायक खड्ड्यापासून सतर्क करण्याचा उपक्रम नुकताच राबविला.यावेळी ॲलन मोरे यांनी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधून रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची तसेच अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत अथवा काम अर्धवट आहे त्या ठिकाणी वाहन चालकांसाठी सावधानतेचा इशारा देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. अंगडी कॉलेज समोरील अर्धवट रस्त्याच्या ठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमात चर्ली विजय मोरे, सोनिया फ्रान्सिस, सिद्धार्थ एच., शुभम सी., संस्कार सी., सिद्धार्थ आर., अक्षय एम., अद्वैत चव्हाण -पाटील, जय एस., देव जैन, ओमकार बी., आर्यन एन., ध्रुव एच., नितीन के., कार्तिक पी., अनिकेत एल., लकी एस. आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.