केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्र येथे जागतिक थॅलसिमिया दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
थॅलसिमियाग्रस्त मुलांमध्ये रक्ताची कमतरता असते. त्यामुळे दरमहा रक्त बदलण्यासाठी इस्पितळाला भेटी द्याव्या लागतात. थॅलसिमियाग्रस्त मुलांच्या शरीरात रक्ताची निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा मुलांच्या आरोग्य रक्षणासाठी रक्ताची गरज असते. म्हणून रक्तदान करून या मुलांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे महेश फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्र, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, युवा रेडक्रॉस व थॅलसिमिया केअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता जाली यांनी थॅलसिमियाविषयी माहिती देताना या इस्पितळात थॅलसिमियाग्रस्त २४० मुलांवर उपचार व बोनमॅरो केले जात आहे.
आतापर्यंत सुमारे ३० बोनमॅरो शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या मुलांवरील उपचारांसाठी रोज २५ बाटल्या रक्त पुरविले जात आहे, असे त्यांनी सांगितले. संकल्प व रेडक्रॉस संस्थेबरोबर करार करून रक्त व उपचार मोफत केले जात आहेत, असेही डॉ. सुजाता जाली यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. महांतशेट्टी, रेडक्रॉस संस्थेचे डॉ. एन. एस. मुलीमनी, डॉ. आर. बी. नेर्ली, रक्तभांडारचे प्रमुख एस. व्ही. विरगी, डॉ. विश्वनाथ पट्टणशेट्टी, डॉ. आरिफ मालदार, डॉ. अभिलाषा, डॉ. राजशेखर सोमनट्टी, डॉ. अश्विनी नरसण्णावर, समर्थ देवळकर आदी उपस्थित होते.