बेळगावातील व्हिक्टोरिया लॉज क्र. 9 च्यावतीने आज शनिवारी विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित विविध धर्मादायक आणि शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
दरवर्षी जगभरातील फ्रीमेसन लॉजिसतर्फे 24 जून हा दिवस विश्व बंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने बेळगावातील व्हिक्टोरिया लॉज क्र. 9 च्यावतीने विविध धर्मादायक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून आज हा दिन साजरा करण्यात आला. एक्सपर्ट व्हॉल्व अँड इक्विपमेंट प्रायव्हेट लि. उद्यमबाग येथे आयोजित या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचाही समावेश होता. याप्रसंगी व्हिक्टोरिया लॉज क्र. 9 चे प्रमुख रतन सिंग ठाकूर, विनायक लोकूर यांच्यासह लॉजचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य तसेच हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. विश्वबंधुत्व दिनानिमित्त यावेळी रक्तदान शिबिर भरवण्याबरोबरच वनमहोत्सव, धान्य दान, शाळा दत्तक घेणे, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण, वैद्यकीय उपचारासाठी सहाय्य वाटप, व्हीलचेअरचे वितरण आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.