No menu items!
Friday, August 29, 2025

समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी महामृत्यूंजय जप केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे निषेधार्ह !

Must read

समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणारा ‘जादूटोणा विरोधी कायदा’ रहित करा ! – हिंदु जनजागृती समिती

समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे; मात्र समाजहित लक्षात घेता हे अपघात होऊ नयेत, यासाठी दिंडोरी (नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ संप्रदायाच्या वतीने सव्वा कोटी महामृत्यूंजय मंत्रजप करण्यात आला. यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोळकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार ‘जादूटोणा विरोधी कायद्या’च्या आधारे बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सद्हेतूने समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणे, हा सरळसरळ जादूटोणा कायद्याचा दुरूपयोग आहे. हा कायदा अंधश्रद्धांचे नव्हे, तर हिंदूंच्या धर्मश्रद्धांचे निर्मूलन करणारा आहे, हेच आज या गुन्ह्यातून सिद्ध झाले आहे. यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरून या कायद्याच्या विरोधात शेकडो आंदोलने केली होती. उद्या जर कोणी विश्वकल्याणार्थ यज्ञयाग केला, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी ‘अंनिस’कडून केली जाईल आणि असे गुन्हे दाखल करून धार्मिक कृत्यांवर गंडांतर आणले जाईल. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक कृत्यांवर गदा आणणारा आणि श्रद्धेवर आघात करणारा हा काळा कायदाच रद्द करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही श्री. घनवट यांनी म्हटले.

श्री. घनवट पुढे म्हणाले की, जादूटोणाविरोधी कायदा हा हिंदु धर्माच्या विरोधातच आहे. जर हा कायदा केवळ फसवणूक, आर्थिक लुबाडणूक वा अत्याचाराच्या विरोधात आहे; तर समृद्धी महामार्गावरील अपघात रोखावेत, जनतेचा जीव वाचावा, या सद्हेतुने स्वत:च्या खर्चाने कोणी प्रार्थना, पूजा, मंत्रजप आदी करत असेल, तर त्यात गैर काय आहे ? यात कोणता अपराध आहे ? यातून कुठे कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली ? याचे उत्तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि त्यांच्या दबावामुळे हा गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांनी हिंदु समाजाला द्यायला हवे ! 

स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दरवर्षी आषाढी अन् कार्तिकी वारीला श्री पांडुरंगाच्या चरणी ‘बळीराजा सुखी होऊ दे, चांगले पीक येऊन, दुष्काळ वा नैसर्गिक आपत्ती दूर होऊ दे’ म्हणून पूजा करतात. मग त्या पूजेवरही अंनिसवाले गुन्हा दाखल करणार का ? अनेक मंत्री निवासस्थानी वा त्यांच्या कार्यालयात ‘शुभ कार्य व्हावे, अडथळे दूर व्हावेत’ म्हणून श्री सत्यनारायण पूजा करतात. त्यांच्यावरही अंनिसवाले गुन्हा करणार का ? जनतेच्या रक्षणासाठी प्रार्थना करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून जनहित कसे साध्य होऊ शकते ? हिंदु धर्मावर आघात करण्यासाठी हा कायदा एक हत्यार म्हणून वापरले जात आहेत. एड्स, कॅन्सर यांसारखे अनेक असाध्य रोग बरा करण्याचा दावा करून जनतेची खर्‍या अर्थाने फसवणूक करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमावर गुन्हा दाखल करण्यासाठी अंनिसवाल्यांनी कधीही पुढाकार घेतला नाही; मात्र येथे महामृत्यूंजय जप केल्यावर गुन्हा दाखल केला, यातूनच यांचा हिंदु धर्मविरोधी चेहरा दिसून येतो. सरकारने अंनिसवाल्यांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा रहित करावा, असे श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

आपला नम्र,
श्री. सुनील घनवट,
राज्या संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती (संपर्क : 7020383264)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!