बेळगाव:
पोटातील आतडी जागी होतात तेंव्हा
अमेझॉनचं खोरं तोकडं पडतं साहेब
भाकरी इतकं सुंदर बेट ऐकीवात नाही माझ्या
अशा बेकारीच्या झळीने बसणाऱ्या तीव्र चटक्याची जाणीव देणाऱ्या कविता आबासाहेब पाटील यांनी सादर करून रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
येथील शब्दगंध कवी मंडळाचा ३३वा वर्धापन दिन सोहळा सरस्वती वाचनालयात पार पडला. शब्दगंध कवी मंडळाचे अध्यक्ष प्रा अशोक आलगोंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात कवी आबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नोकरी नसलेल्या पोरांविषयी त्यांचे बाप कधीच कौतुकाचे बोल काढत नसतात. म्हणून आबासाहेब यांनी बेकारांचे बाप या कवितेत
नोकरी नावाची कजाल पोर
धनिकाचा हात धरुन पळून जाते
तेंव्हा माझी कविता बेकाराच्या आईसारखि
धमसत राहते
इतके ठळक वास्तव मांडले. अशा दारिद्र्याचे असंख्य अनुभव गाठीशी असलेल्या तरुणाला हसणाऱ्या कोणत्याही स्त्रीचे भाकरी इतके अप्रूप वाटत नाही. ‘मोनालीसा’ कवितेत भाकरीचे सौंदर्य उलगडून दाखवले
माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत
अशीच हसत रहा मोनालिसा
तुला हसताना पाहूंन
मलाही बरं वाटतं
तुझं हसणं भाकरीइतकं सुंदर वाटतं
शेतात, गोठ्यात, मजुरीला जाताना मागे मागे येते तेव्हा त्या कवितेकडे बाबघायलाही उसंत मिळत नसल्याची खंत देखील त्यांनी कवितेतून मांडली. रद्दीतही कवितेला कोणी मोल देत नसलेल्या आशयाची ‘अडगळ: माझं लक्ष आहे तुझ्याकडे’ ही कविता आणि आपल्या कष्टाला कधी अंतच नसल्याने सत्तेशी भांडता येत नाही म्हणून देवाशी जाब विचारणारी ‘युगे अठ्ठावीस’ कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी आबासाहेब पाटील यांच्या कविता रसिक श्रोत्यांच्या मनाला थेट भिडत असल्याची जाणीव त्यांच्या सादरीकरणावेळी होत होती.
प्रारंभी आबासाहेब पाटील, विनोदी कथाकार सुभाष सुंठणकर, कवी प्रा चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुधाकर गावडे यांनी केले. कवी आबासाहेब पाटील यांचा सत्कार सुभाष सुंठणकर यांच्या हस्ते करण्यात आला. कोवाडचे कवी जयवंत जाधव यांच्या ‘वळणं आणि वळण’ या आत्मकथन पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. अशोक आलगोंडी यांनी शब्दगंधच्या जडणघडणीविषयी माहिती दिली. यावेळी ‘शब्दगंध काव्यलेखन स्पर्धेतील’ विजेत्या कवींना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.
शाळा विभागात प्रथम कु. प्राची प्रकाश सुतार (बालिका आदर्श विद्यालय, बेळगाव), द्वितीय कु. हर्ष अजय पावशे (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव), तृतीय कु. सारिका बाळू ढोपे (भगतसिंग हायस्कूल, आंबेवाडी), उत्तेजनार्थ कु. शिल्पा राजेंद्र पाटील (घटप्रभा हायस्कूल, सलामवाडी) आणि कु. सृजन अनिल पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) यांची निवड झाली. तर महाविद्यालयीन विभागात प्रथम कु. साक्षी गडकरी (जी.एस.एस. कॉलेज, बेळगाव), द्वितीय कु. मधू मनोहर परमोजी (बी.के.कॉलेज, बेळगाव), तृतीय कु. ऋषीकेश उमेश देसाई (जैन पोलिटेकनिक कॉलेज, बेळगाव), उत्तेजनार्थ सुवर्णा लक्ष्मण पाटील (मराठी विभाग, राणी चन्नमा विद्यापीठ) आणि कु. अलंकार प्रकाश आलासे (बी.के.कॉलेज, बेळगाव) यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला बसवंत शहापुरकर, व्ही.एस.वाळवेकर, रेखा गद्रे, उर्मिला शहा, परशराम खेमणे, स्मिता किल्लेकर, मधू पाटील, भारत गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने कवी आणि रसिक श्रोते उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ अस्मिता अळतेकर यांनी केले तर आभार श्रीमती अश्विनी ओगले यांनी मांडले.